धक्कादायक! बसमधील महिलेने चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला, व्हिडीओ व्हायरल झाला अन् तरुणानं गळफास घेत जीवन संपवलं

सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोण कोणता हातखंडा वापरेल याचा काही अंदाज नाही. अनेकदा आपण करत असलेली कृती आणि सोशल मीडियावर चालवत असलेली ट्रायल दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. यातून अनेकदा वादविवादही होतात. पण आता केरळमध्ये याहून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बसमधील महिलेने चुकीने स्पर्श केल्याचा आरोप लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका तरुणाने गळफास घेत जीवन संपवले. दिपक यू (वय – 42) असे तरुणाचे नाव आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

केरळमधील कोझिकोड येथे ही हृदयद्रावर घटना घडली आहे. सोशल मीडियावर विनयभंगाचा आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दीपक यू याने मानसिक तणावातून आत्महत्या केली. दीपक कोझिकोडमधील गोविंदपूरम येथील रहिवासी होती. रविवारी सकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. सकाळी सातच्या सुमारास त्याच्या पालकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. दार ठोठावूनही त्याने आतून प्रतिसाद न दिल्याने त्याच्या पालकांना शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी दीपक मृतावस्थेत आढळला.

नेमके प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी एका महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पय्यानूर रेल्वे स्थानक ते बस स्टँड दरम्यान प्रवास करताना दीपक यांनी गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आणि सुमारे 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपक यांना मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोलिंग आणि शिवीगाळीचा सामना करावा लागला. यामुळे दीपक मानसिक दडपणाखाली होते आणि याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

ऑनलाईन प्रसिद्धीसाठी मुलावर खोटे आरोप

दीपकच्या पालकांनी मुलावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. संबंधित महिलेने केवळ ऑनलाईन प्रसिद्धीसाठी मुलावर खोटे आरोप केले आणि त्याचे चारित्र्यहनन केले. सततचा मानसिक छळ आणि सोशल मिडिया ट्रायल यामुळे मुलगा खचून गेला होता. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप दीपकच्या पालकांना केला.

पोलीस तपासात सत्य समोर येणार?

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. यावर संबंधित महिलेनेही अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तरुणाने आत्महत्या करताच तिलाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पोलीस तिची चौकशी करून सत्य समोर आणतील अशी आशाही नेटकऱ्यांनी व्यक्त केली.