पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव; नराधम गजाआड

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीला रॉकेल ओतून पेटवून दिले. पत्नीने जाळून घेत आत्महत्या केल्याचा केलेला बनाव प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या सात वर्षांच्या मुलीनेच उघड केल्याने उरण पोलिसांनी पलायनाच्या तयारीत असलेल्या राम शाहू (35) या नराधमाला अटक केली आहे.

कंटेनर ट्रेलरवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा राम शाहू (35) मूळ राहणार मध्य प्रदेशमधील आहे. तो आपली पत्नी जगराणी (35) आणि सात वर्षांच्या मुलीबरोबर पागोटे – उरण येथे भाड्याने खोली घेऊन राहात होता. पत्नी जगराणी हिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पती पत्नीत नेहमीच भांडणे सुरू होती. सोमवारी रात्री पती पत्नी यांच्यात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. यातून शाहू याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने पत्नीने आत्महत्या केली असे पोलिसांना भासवले. सात वर्षांच्या मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर उरण पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.