परळमध्ये 5 फेब्रुवारीपासून रंगणार माणदेशी महोत्सव

माणदेशी फाऊंडेशन आयोजित बहुप्रतीक्षित माणदेशी महोत्सव 2025 हा अस्सल मराठमोळय़ा मातीचा महोत्सव 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 10.30 ते रात्री 9.30 या वेळेत परळच्या नरे पार्कमध्ये रंगणार आहे. ग्रामीण उद्योजकता, पारंपरिक हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीचे अनोखे मिश्रण असलेल्या या उत्सवाची दरवर्षी मुंबईकर मोठय़ा आतुरतेने वाट पाहतात.

माणदेशी या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि एच. टी.पारेख फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झिया ललकाका, एचएसबीसीच्या ‘परोपकार व शाश्वतता’ विभागाचे जागतिक प्रमुख अलोका मजुमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळा गजी नृत्याने सुरू होईल. याच सोहळय़ात माणदेशी महिलांनी 10 लाख महिला सक्षमीकरणाचा मैलाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच मंगळागौर कार्यक्रम सादर केला जाईल.

महोत्सवाच्या दुसऱया दिवशी सायंकाळी 6 वाजता मुलींची माणदेशी कुस्ती आणि बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा पार पडेल. शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता माणदेशी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजल्यापासून गायक – संगीतकार अवधूत गुप्ते आपली संगीत रजनी सादर करणार आहेत. शनिवार, 8 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून अभंग सादरीकरण होईल. रविवार, 9 फेब्रुवारी सायंकाळ 5 वाजल्यापासून समारोप सोहळय़ाला सुरुवात होईल.

महोत्सवाची वैशिष्टय़े

महोत्सवात ग्रामीण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन आणि कुस्तीसारख्या लाल मातीतल्या खेळांचा आनंद घेता येईल, अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना गाला सिन्हा यांनी दिले. ग्रामीण महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी रुचकर भोजन दालन, हस्तकला प्रदर्शन व विक्री, हस्तकला कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा बाजार, ग्रामीण संस्कृतीचा अनुभव, महिला उद्योजकांचा सन्मान ही यंदाच्या महोत्सवाची वैशिष्टय़े आहेत.