हापूसचे दर पडल्याने बागायतदार कॅनिंगकडे वळले

कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची आता अखेर सुरू झाली आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर आता दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात हापूस पाठवणे बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने बागायतदार आता कॅनिंग उद्योगाकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कॅनिंगसाठी मिळणारे दर समाधानकारक असले तरी प्रतिकूल हवामानामुळे यंदा हापूसचे उत्पादन सुमारे 25 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे कॅनिंगसाठी पुरेसा आंबा उपलब्ध नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हवामानातील बदलांपासून औषध फवारणी आणि त्याचा खर्च यामुळे बागायतदारांना नफा-तोट्याचे गणित जुळवणे कठीण झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला हापूसला चांगला भाव मिळाला होता. चार डझनच्या पेटीला 8 ते 9 हजार रुपये इतका दर मिळत होता. मात्र सध्या बाजारात प्रतिपेटी सरासरी 800 ते 900 रुपये दर मिळत असल्याने वाहतूक आणि इतर खर्च पाहता आंबा बाजारात पाठवणे बागायतदारांना परवडणारे नाही.

अंतिम टप्प्यात कॅनिंगवर जोर

मे महिन्यात पाऊस पडल्यानंतर आंबा दरात मोठी घसरण झाल्यामुळे बागायतदार आणि व्यापारी आता कॅनिंगवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अन्य वेळी या काळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते, परंतु यंदा आंबा उत्पादन घटल्याने कॅनिंग उद्योगाला पुरेसा माल मिळत नाही. सध्या कॅनिंगसाठी प्रतिकिलो 32 ते 34 रुपये दर मिळत असून गेल्या चार दिवसांत कॅनिंगच्या दरातही थोडी वाढ झाली आहे. या वर्षी कॅनिंगसाठी चांगला भाव मिळत असला तरी देण्यासाठी आंबाच नसल्याची खंत आंबा बागायतदार रवींद्र हळबे यांनी व्यक्त केली.