
वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलाचा मोठा फटका उरण परिसरातील १६० हेक्टरवर हापूस आंब्याच्या बागांना बसला आहे. सध्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडावरील मोहोर काळवंडला असून कैऱ्या करपल्या आहेत. कैऱ्या गळण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने झाडाखाली कैऱ्या आणि मोहराचा थर साचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याच्या झाडांची फक्त ३० टक्के फूट झाली आहे. हा आंबाही आता धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
उरण परिसरातील कळंबुसरे, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, सारडे, वशेणी, चिलें, नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, रानसई आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी भातशेतीला जोडधंदा म्हणून १६० हेक्टर क्षेत्रावर आंब्याच्या बागा फुलवल्या आहेत. उरण परिसरात डिसेंबर महिन्यात योग्य प्रमाणात थंडी पडल्याने आंब्याच्या झाडांना चांगला मोहोरही आला होता. त्यामुळे बागायतदारांनाही समाधानकारक उत्पादन अपेक्षित होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्यामुळे आंब्याच्या मोहोरावर विपरीत परिणाम झाला आहे. यंदा परतीचा पाऊस फार लांबल्याने आंब्याच्या झाडांना मोहोरही उशिरा आला होता. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने आंबाच्या झाडांना मोहोर नीट फुललाच नाही. मात्र त्यानंतर जानेवारीअखेरपासून हवामानातील बदलामुळे परागकणावर परिणाम झाला. मात्र अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडांवरील शिल्लक मोहोर करपून गेला आहे. याआधी आलेली फळधारणादेखील कमी झाली. कैऱ्या करपून तसेच गळत असल्यामुळे उत्पादनात घट होणार आहे.
आर्थिक मदत करण्याची मागणी
आंब्याचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. कृषी विभागाने नुसती पाहणी करणे पुरेसे नाही, तर नुकसानग्रस्त शेतकरी, आंबा बागायतदारांना योग्य ती आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी व्यक्त केली आहे.
- सध्या दिवसा उन्हाचा कडाका वाढू लागल्याने वाढत्या उष्णतेमुळे आंबा मोहोर काळवंडण्यास सुरुवात झाली. रात्री थंडी, दिवसा उष्मा आणि ढगाळ वातावरण असल्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
- बदलत्या वातावरणामुळे आंबा मोहोरावर तुडतुडा, लाल कोळी, भुरी रोग यातून मोहोर काळा पडणे अशा रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे.. त्यामुळे आंब्यांची देखभाल व कीटकनाशक फवारणी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.
- थ्रीप्स व तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधांच्या फवारणीनेही आंबा पिकावरील रोग पूर्णपणे नियंत्रणात येत नाही. यंदा आंब्याचा हंगाम लांबणार आहे. त्यामुळे आंबा विक्रीवरही त्याचा परिणाम होणार आहे.
- उरण परिसरातील गावातील आंबा बागायतदारांच्या बागांना भेटी देऊन कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी आंबा बागांची पाहणी केली. दरम्यान, परतीचा पाऊस लांबल्याचा आणि वातावरणातील वाढत्या उष्म्याचा आंबा पिकावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





























































