ही माझ्यासाठी लाजिरवाणी बाब; सुरक्षा ताफ्यावरील हल्ल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करूनही येथील परिस्थिती सुधारलेली नाही. अनेक प्रयत्न करूनही मणिपूर अशांतच आहे. नुकताच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडले असून माझ्याच राज्यात, माझ्याच सुरक्षा ताफ्यावर हल्ला झाला. ही माझ्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षी 3 मे रोजी मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समाजामध्ये आऱक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार उफाळून आला. यात शेकडो लोकांनी प्राण गमावले, तर हजारो लोकांना घर सोडून पळ काढावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जात असले तरी अधूनमधून येथे हल्ले होत आहेत. नुकताच जिरिबाम भागात गोळीबार झाला होता. यामुळे अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले. येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावरच घात लावून हल्ला करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांच्याच ताफ्यावर हल्ला झाल्याने मणिपूरमध्ये शांतता असल्याचा दावा फोल ठरला आहे. या संबंधी ‘आज तक’शी बोलताना मुख्यमंत्री एन बिरने सिंह यांनी गेल्यावर्षी जे काही झाले त्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचे मान्य केले. परंतु केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सुधारणा होत आहे, असे ते म्हणाले. तसेच मणिपूरमध्ये शांतता नांदण्यासाठी आणखी काही वेळ जाईल. यासाठी राजकीय संवाद आवश्यक असून गोळीबाराच्या घटनांमध्येही घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिरिबिम भागात झालेल्या हल्ल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी याचे खापर गुप्तचर यंत्रणा आणि सिक्योरिटी कोऑर्डिनेशवर फोडले. तसेच याची चौकशी करण्याचे आदेशही दिले.