मुख्यमंत्री फडणवीसच ओबीसी-मराठ्यांत दुरावा निर्माण करत आहेत, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

आम्ही कोणताही जातीवाद करत नाही. फक्त आमच्या मराठ्यांच्या लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ओबीसी-मराठ्यांत दुरावा निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की, ओबीसी आणि मराठ्यांत हे सरकार वाद पेटवत असल्याचे मत जरांगे यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी काही माणसे पेरली आहेत की, आम्हाला जातीवादी म्हणा जातीवादी म्हणा. मात्र अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

हिंगोली येथे मनोज जरांगे यांचे आगमन झाल्यानंतर जेसीबीच्या साह्याने फुलांची पृष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले की, या सरकारला ओबीसी आणि मराठ्यांत विनाकारण वाद पेटवून संघर्ष घडून आणायचा आहे. त्यामुळे मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जायचे नाही आणि ओबीसींनीही अंगावर यायचे नाही.

आपण शेवटी भाऊ-भाऊ आहोत. एका गावात राहावे लागते. आपल्या सुख-दु:खात राहावे लागते. कोणाचे ऐकून आपण अजिबात नाराजी अंगावर घ्यायची नाही. आमचे हक्काचे आरक्षण आहे तेच आम्ही घेत आहोत. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे. असे  जरांगे यांनी सांगितले.

भाजपने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली

मतदार याद्यांमधील अनेकांच्या बापांची नावे बदलण्यात आल्याचे समोर आणले आहे. त्यावर तुम्हाला‌ काय वाटते, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर जरांगे यांनी भाजप हे बापांचे नाव‌ बदलू शकतो. कारण भाजपवाले कोणती वायर कुठेही जोडू शकतात. अजितदादांची वायर त्यांनी भाजपला जोडली आहे. ती वायर म्हणजे सगळे बल्ब उडविते.  एकनाथ शिंदेंचीही वायर जोडली आहे. भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस‌ फोडल्याचे त्यांनी सांगितले.