
जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानांनंतर नवा वाद निर्माण झाला असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जैन मुनींवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “जैन मुनींना फटके खायचे आहेत का?” असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “हे मुनी म्हणजे नक्की कोण आहेत? यांची पैदास कुठून झाली आहे? त्यांचे डोके सडले आहे का?” ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा अवमान सहन केला जाणार नाही.
जरांगे म्हणाले, “महाराणी ताराराणी साहेबांचा तुम्ही अवमान करत आहात. छत्रपतींच्या उंचीशी कोणाचीही तुलना करू नका, अन्यथा फटके खाल,” असा इशारा त्यांनी दिला. अशा प्रकारे विधाने करणाऱ्यांना वेळीच ठेचून काढले पाहिजे, तरच ते ताळ्यावर येतील, असेही जरांगे पाटील म्हणाले.

























































