सरसकट गुन्हे मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळे सरसकटच गुन्हे मागे घ्यावे लागतील. मराठय़ांसाठी मी खंबीर असून, गुन्हे कसे मागे घेतले जात नाही ते मी बघतोच, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी सरकार विरोधात सतत आंदोलने करून 850 पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावलेत. फडणवीस जरी शब्दापासून बदलले असले तरी मी बदलणार नाही. राहिलेल्या गुह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणे गरजेचे आहे. मी आरक्षण तर घेणारच. पण राहिलेले गुन्हेही मागे घ्यायला लावणार, असेही जरांगे म्हणाले.

यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचाही समाचार घेतला. तुमची मस्ती जिरवण्यासाठी आरक्षण उपसमिती नाही. मराठेच मराठय़ांच्या अंगावर घालणे हे आरक्षण उपसमितीचे काम नाही. कोणते खटले न्यायालयात प्रलंबित आहेत त्यावर तोडगा काढणे आरक्षण उपसमिती अध्यक्षांचे काम, हे त्यांना कळत नाही का? असा सवालही जरांगे पाटील यांनी विखे यांना केला.