
छत्रपती ताराराणी यांना जैन धर्मीय म्हणणाऱया आणि नीतेश राणे यांची शिवरायांशी तुलना करणाऱया जैन मुनींवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले आहेत. ‘जैन मुनी हे आता मुनी राहिले नाहीत, ते ‘मुनीरभाई’ बनले आहेत! ते धर्मगुरू असूच शकत नाहीत. त्यांनी तोंडाला आवर घालावा, नाहीतर मराठे पिसाळले तर फटके दिल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा सणसणीत इशारा जरांगे यांनी दिला.
जैन मुनी आचार्य नयपद्मसागर यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रणरागिनी महाराणी ताराराणी या जैन असल्याचे म्हटले होते. आता आणखी एक जैन मुनी नीलेशचंद्र यांनी नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवरायांप्रमाणेच आहे, असे वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मनोज जरांगे यांनी यावर बोलताना जैन मुनींना खडे बोल सुनावले. ‘समाजात विष पेरणारे हे लोक धर्मगुरू कसे असू शकतात? मुख्यमंत्र्यांनी या मुनीरभाईंना त्यांच्या पद्धतीने समज द्यावी. मराठे पिसाळले तर अशा जैन मुनींचे थोबाड पह्डल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत,’ अशी तंबी जरांगे यांनी दिली. .
नेमका वाद कशामुळे?
नीलेशचंद्र यांची मुक्ताफळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवा शिळफाटा येथे आयोजित हिंदू संमेलनात नीलेशचंद्र यांनी मुक्ताफळे उधळली. ‘नितेश राणे यांची उंची शिवरायांएवढीच असून त्यांना मंत्री नव्हे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायला हवे. त्यांची कार्यपद्धती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी आक्रमक आहे, असेही नीलेशचंद्र बरळले.
नयपद्मसागर काय बोलले होते…
‘मोघल बादशहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले. अशा काळात एका जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी. औरंगजेबाचा पराभव करण्याचे काम त्यांनी केले. हा जैन महिलांचा इतिहास आहे,’ असे वक्तव्य मुनी नयपद्मसागर जैन यांनी नुकतेच समाजाच्या एका कार्यक्रमात केले होते.

























































