चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा असलेल्या अभावामुळे मेटाकुटीला आलेल्या अनेक कंपन्या या गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशला स्थलांतरीत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. जुलै महिन्यात येथील अपुऱ्या सोयी सुविधां व वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात उच्चस्तरीय बैठक मुंबईत घेतली होती. मात्र त्यानंतरही अनेक कंपन्यांनी बाहेरच्या राज्यांची वाट धरल्याने हे मिंधे सरकारचे मोठे अपयश असल्याचे बोलले जात आहे.
चाकण हे वाहननिर्मिती उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. तेथे मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, ब्रीजस्टोन, ॲटलास कॉप्कोसह अनेक जागतिक पातळीवरील कंपन्या आहेत चाकणमधील अनेक पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तेथील वाहतूक कोंडी ही देखील तिथल्या कंपन्यांसाठी मोठी डोकेदुखी बनली होती. कंपन्या परराज्यांत स्थलांतरित होत असल्याचा मुद्दा चाकणमधील फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज या संघटनेकडून वारंवार उपस्थित केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै महिन्यात उच्चस्तरीय बैठक मुंबईत घेतली होती. मात्र त्या बैठकीनंतर सरकारी यंत्रणांकडून बैठका घेण्याशिवाय कोणतीच पावले उचलली जात नाही, त्यामुळे एमआयडीसीतील सुमारे 50 कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. याला चाकणमधील उद्योग संघटनेने दुजोरा दिला आहे. या 50 कंपन्यांमध्ये महिंद्रा कंपनीचा देखील समावेश असल्याचे समजते.
”चाकण हे महत्त्वाचे वाहननिर्मिती केंद्र असून, तेथील सध्याची पायाभूत सुविधांची अवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत होत आहेत. तिथे रस्त्यांचे काम सुरू असले तरी खड्ड्यांची समस्या कायम आहे. खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसह अपघात वाढले आहेत. यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. कंपन्यांना कच्चा माल वेळेवर मिळण्यास आणि तयार उत्पादन बाजारपेठेत पोहोचविण्यास उशीर होत आहे. उद्योग संघटनांकडून वारंवार तक्रारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंळाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका होऊनही कोणतीही प्रगती झालेली नाही. आतापर्यंत 50 कंपन्या येथून गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. याआधीही अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जात आहेत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांची टीका
”महाराष्ट्रातील सर्वात चर्चित ‘एमआयडीसी’पैकी एक असणाऱ्या चाकण ‘एमआयडीसी’तून एक-दोन नाहीतर 50 कंपन्या बाहेर गेल्या आहेत. औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रातील ही स्थिती आहे. उद्योग तेंव्हाच थांबतात जेंव्हा तुम्ही त्यांना योग्य त्या पायाभूत सुविधा पुरविता. गेल्या काही वर्षांतील प्रचंड वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे येथे उद्योग सुरु ठेवण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत. याबाबत सातत्याने मांडणी करुन देखील राज्य शासनाची भूमिका उदासीन आहे. यामुळेच ही स्थिती उद्भवली असून राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यात निघून गेला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे याबाबत काय म्हणणे आहे ? असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.