
गणेशोत्सवासाठी लाडकी ‘लाल परी’ एसटीने कोकणात जाण्याची तयारी केलेल्या हजारो चाकरमान्यांचा ‘एसटी’ संपामुळे मुंबईतच ‘मोरया’ होण्याची भीती वाटत आहे. सरकार जोपर्यंत सर्व प्रलंबित मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला असताना सरकारसोबत आज झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे चाकरमानी कोकणात जाणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हजारो रुपये आगाऊ भरून रिझर्व्हेशन केल्याने इतर सुविधेने तरी कसे जाणार, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील चाकरमान्यांसमोर निर्माण झाला आहे.
सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईत राहणारा चाकरमानी मिळेल त्या मार्गाने कोकणातील घर गाठत आहे. यातच रेल्वेला पडलेल्या ‘एजंट’च्या विळख्यामुळे रेल्वेच ‘कन्फर्म तिकीट’ मिळत नसल्याने सर्वसामान्य माणूस ‘गडय़ा आपली एसटीच बरी’ असा विचार करून ‘एसटी’नेच गावी जाण्याचे नियोजन करतो. मात्र या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचा संप सुरू झाल्याने चाकरमानी अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे अनेक ग्रुप रिटर्न प्रवासासाठी पूर्ण बसचे बुकींग करीत असल्यामुळे संप लांबला तर चाकरमान्यांचे मुंबईला परत यायचेही वांदे होणार आहेत.
खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट
– मुंबईतून कोकणात जाण्यासाठी एसटीचे भाडे एक हजार रुपयांच्या घरात असते. तर खासगी बसचे नियमित भाडेही 500, 700 ते एक हजार रुपयांपर्यंत असते. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसांत दरवर्षीप्रमाणे खासगी लक्झरीवाल्यांकडून बसचे तिकीट किमान दोन हजार ते तीन-चार हजारांवर नेले जाते.
– यावर सरकारचा निर्बंध नसल्याने खासगी बस ट्रव्हल्ससह खासगी ट्रव्हल्स गाडीवाल्यांकडून अवाच्या सवा भाडे आकारून मुंबईकरांची लूट केली जाते. यातच या वर्षी सर्वसामान्यांचे वाहन असलेल्या एसटीचा संप असल्याने खासगी ट्रव्हल्सला चाकरमान्यांच्या लुटीची संधीच मिळाली आहे.
बससेवा ठप्प
विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळातील विविध अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने संप पुकारला आहे. त्यामुळे आज राज्यातील एसटी 251 आगारांपैकी 59 बस आगार पूर्णपणे बंद होती. 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरु होती. तर 115 आगारांमध्ये वाहतूक पूर्णपणे सुरु होती. एसटी बसेसच्या दिवसभरात सुमारे 22 हजार 389 फेऱया होतात. त्यापैकी 11 हजार 943 फेऱया आंदोलनामुळे रद्द कराव्या लागल्या. दिवसभर 50 टक्के वाहतूक बंद होती. एसटी कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचे आज दिवसभरात 14 ते 15 कोटी रुपयांचा महसूल बुडला.
संप बेकायदा
औद्योगिक न्यायालयाने एसटी कर्मचाऱयांचा संप बेकायदा घोषित केला आहे. संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कामावर रुजू होणाऱया कर्मचाऱयांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱया संपकरी कर्मचाऱयांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत. पुराव्यासाठी या घटनेचे चित्रिकरण करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.
संप फोडण्याची तयारी
एसटीची वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून उद्यापासून दीर्घकाळासाठी करार पद्धतीने चालक व आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाने चाचपणी सुरु केली आहे.
कर्मचाऱयांच्या काही प्रमुख मागण्या
– राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे.
– जुलै 2018 ते जानेवारी 2014 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता
– शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ लागू करा
– वेतनवाढीची 4 हजार 849 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप करावी
– सेवाज्येष्ठ कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करून सरसकट पाच हजार रुपये द्या.
– वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना लागू करा
– कर्मचारी व कुटुंबियांमध्ये फरक न करता एसटीमध्ये मोफत पास सवलत
ग्रुप रिझर्व्हेशनला फटका
मुंबईतील प्रत्येक डेपोमधून शेकडो बस गणेशोत्सव काळात कोकणात सोडल्या जातात. यामध्ये गावागावात जाण्यासाठी आगाऊ ग्रुप रिझर्वेशन केले जाते. अनेक पुटुंबांमध्ये गावचे घर बंद असल्याने यामध्ये एकाच बसने अनेक पुटुंबे एकाच वेळी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी काही दिवस आधीच कोकणात जातात. मात्र गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना ‘एसटी’ संघटनांनी संप पुकारल्याने ग्रुप रिझर्व्हेशनचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बसवर दगडफेक
‘एसटी’चे सुमारे 251 आगार आहेत. यातील 78 आगारांमध्ये संप सुरू असून हजारो प्रवासी आज आगारात ‘वेटिंगवर’ राहिले. मुंबईतून गणपतीसाठी सावंतवाडी व अन्य ठिकाणी काही बस मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र या बसवर दगडफेक झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे मुंबईतून बस निघाली तरी वाटेत कामगारांच्या संतापाचा फटका बसल्यास जबाबदार कोण, असा सवाल चाकरमान्यांनी केला.
सरकारचे आवाहन धुडकावले
चर्चेतून मार्ग काढू, संप पुकारू नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तर एसटी कर्मचाऱयांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीत सरकारचे आवाहन संघटनांनी धुडकावले. कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपावर मार्ग काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे.