
भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मला 30 ते 32 आमदार व खासदारांचे फोन आले असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वत:चे ओएसडी दिले आहेत. भाजप पक्ष वेगळा होता. पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे, अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे, असा आरोप जरांगे-पाटील यांनी केला.