26 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर 27 ऑगस्टला मुंबईकडे निघणार

मराठा आरक्षण उपसमितीची पुनर्रचना म्हणजे पोळ्याच्या दिवशी केलेला खांदेबदल आहे. आमच्या मागण्या वेगळय़ा आहेत. 26 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, नसता 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठा समाज मुंबईकडे निघणार असल्याचा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे. आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण उपसमितीमध्ये करण्यात आलेल्या बदलावरून सरकारला धारेवर धरले. हा बदल म्हणजे निव्वळ खांदेपालट असल्याचे ते म्हणाले. आमच्या मागण्या वेगळय़ा आहेत. आम्ही त्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यावर सरकारने 26 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, नसता राज्यातील संपूर्ण मराठा समाज 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे पूच करेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच हा दिवस आंदोलनासाठी निश्चित करण्यात आला. गणेशोत्सव आणि आंदोलनाचा काहीही संबंध नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.