मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, तीन उपोषणार्थींची प्रकृती ढासळली; मंडपात जमिनीवरच उपचार सुरू

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आठव्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याबरोबर इतरही अनेकजण उपोषणाला बसले असून त्यापैकी तिघांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. उपोषणार्थींवर मंडपात जमिनीवरच उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, जरांगे यांनी ‘आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, सरकारने शिष्टमंडळ पाठवावे’ असे म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 जानेवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या विविध भागातून आलेले शेकडो कार्यकर्तेही उपोषणाला बसले आहेत. यात सत्तरवर्षीय पांडुरंग सावंत, सतीशराव पाटील आणि भगवान शेंडगे यांचाही समावेश आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी  मंदाकिनी बारकूल (येरमाळा), सुभाष खांडे (येरमाळा) तसेच भीमराव कोकाटे (गेवराई) या तीन जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. मनोज जरांगे यांचाही रक्तदाब आणि साखर कमी झाली आहे. तीन दिवसांत त्यांचे वजनही घटले आहे.