
पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईची ‘कनेक्टिव्हीटी’ अधिक वेगवान करणाऱ्या भुयारी मेट्रोच्या (ॲक्वा लाईन) वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी (08 ऑक्टोबर 2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन झालं आणि मेट्रो जनतेच्या सेवेत दाखल झाली. सुंदर स्टेशन, आलिशान कोच पण तिकिटावर मराठी भाषेचा समावेश नाही आणि सूचनाही मराठीमध्ये नाही. यामुळे मेट्रो प्रशासना मराठीचा विसर पडलाय का? असा सवाल निर्माण झाला आहे. ही मराठी माणसाला दुय्यम ठरवण्याची मानसिकता आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीने दिली आहे.
मराठी एकीकरण समीतीने ट्वीटरवर (X) पोस्ट करत प्रशासनाला सवाल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नव्याने सुरू झालेल्या मेट्रो ३ ॲक्वा लाईनने प्रवास केला. सुंदर स्टेशन, आलिशान कोच, पण तिकीटावर मराठी नाही. ही गोष्ट खटकली नाही, तर त्रासदायक आहे. कारण याबद्दल ६ महिन्यांपूर्वी प्रशासनाने आश्वासन दिलं होतं. ३ एप्रिल २०२५ रोजी अधिकृत निवेदन देऊन सांगण्यात आलं होतं की “मुंबई मेट्रो रेल ३ च्या तिकीट सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत आणि कार्यवाही शिघ्रतेने सुरू आहे.” पण आज, ऑक्टोबर २०२५ मध्ये, स्थिती तीच आहे. तिकीट इंग्रजीत, सूचना इंग्रजीत, आणि प्रशासनाचे आश्वासन फक्त “प्रेस नोट”पुरते मर्यादित, असं म्हणत मराठी एकीकरण समितीने प्रशासनाला सुनावलं आहे.
मुंबईच्या भूमीत, मराठी भाषिक प्रवाशालाच त्याच्या भाषेत तिकीट मिळणं शक्य नाही! ही “तांत्रिक प्रक्रिया” नाही ही मराठी माणसाला दुय्यम ठरवण्याची मानसिकता आहे. सरकार बदलली, मंत्री बदलले, पण मराठी भाषेचा आदर बदलला नाही. प्रशासन लोकांना मूर्ख समजतंय, कारण एकदा “शिघ्र कार्यवाही” बोलून सर्व काही झाकलं जाईल, असं त्यांना वाटतं. पण मराठी माणूस गप्प बसणार नाही. मराठी भाषेचा वापर ही मागणी नाही, हक्क आहे. आणि हक्क झुकून मागायचा नसतो, उठून मिळवायचा असतो, असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे.
मेट्रो ३ च्या तिकीटांवर तात्काळ मराठी भाषा लागू करावी. सर्व स्टेशनवरील फलक, सूचना, आणि ऑडिओ घोषणा मराठीत असाव्यात. आश्वासन दिलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा मराठी एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.