
>> शंकर बळी
क्रांतिकारक धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी (15 नोव्हेंबर) प्रा. डॉ. सखाराम डाखोरे यांचा ‘हूलबिगूल’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाच्या शीर्षकानेच वाचकांचे लक्ष वेधले. यातील पहिला शब्द ‘हूल’ आणि दुसरा ‘बिगूल.’ ‘हूल’ हा शब्द संथाळी भाषेतील आहे, तर ‘बिगूल’ हा शब्द मूळचा इंग्रजी भाषेतील आहे.
इंग्रजी राजवटीत आदिवासींवरील अन्याय-अत्याचार वाढले होते. तेव्हा संथाळ या आदिवासी जमातीतील सिद्धू, कानू, चांद व भैरव या चार भावांनी तेव्हाचे बिहार आणि आताचे झारखंड येथून कोलकात्यापर्यंत मार्च काढायचे ठरवले, पण आदिवासींच्या मार्चवर इंग्रजी पोलिसांनी हल्ला चढवला. मग या चार भावांनी व फुलो आणि झानो या त्यांच्या दोन बहिणींनी इंग्रजांच्या विरुद्ध जो सशस्त्र विद्रोह केला त्याला ‘हूल’ असे म्हणतात. संथाळी भाषेत हूल म्हणजे विद्रोह, बंड. बिगूल या इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ आहे एक वाद्य, जे सैनिकांना जागविण्यासाठी किंवा युद्धाला सुरुवात करण्यासाठी वाजविले जाते. दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ म्हणजे आदिवासींवर, वंचितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध विद्रोह करणे किंवा तसे करण्यासाठी जागृती निर्माण करणे होय.
या संग्रहात एकूण 74 कविता आहेत आणि त्या दोन विभागांत आहेत. पहिल्या विभागात मराठी भाषेतील एकूण 69 कविता आहेत तर दुसऱ्या विभागात आंधी बोलीतील 5 कविता आहेत. जल, जंगल व जमीन वाचवणे आणि आदिवासी व त्याचप्रमाणे इतर वंचितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हा या कवितासंग्रहाचा आत्मा आहे. यातील काही कविता निसर्गाचं प्रेमळ वर्णन करणाऱ्या आहेत, तर काही कविता निसर्ग वाचवण्यासाठी विद्रोह करायला लावणाऱ्याही आहेत.
या कवितासंग्रहात आंधी बोलीतील पाच कविता आहेत. आंध आदिवासी जमात जी भाषा बोलते तिला ‘आंधी बोली’ असं म्हटलं जातं. आंध जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात राहते. त्याचप्रमाणे तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही या जमातीचा निवास आहे. एक भाषा नष्ट झाली तर ती बोलणाऱ्यांची संस्कृतीही नष्ट होते असे म्हणतात. आजवर अनेक बोली नष्ट झाल्या आहेत, तसेच काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही प्रािढया अजूनही सतत सुरू आहे. अशातच काही अभ्यासक, विचारवंत बोलीभाषा पुनरुज्जीवित करण्याचे काम करतात. त्यामध्ये आता प्रा. डॉ. सखाराम डाखोरे यांचेही नाव गणले जाईल.
बोलीभाषेचे महत्त्व सांगताना कवी म्हणतात-
बोलींची मुळं उखडून
आम्हाला फुलवताच येणार नाही
प्रमाण भाषेचा महावृक्ष
मित्रांनो, बोलीच देतात समृद्ध समाजाची साक्ष
या कवितासंग्रहामध्ये आंधी बोलीतील पहिली कविता आहे, ‘सिकोन.’ सिकोन म्हणजे शिकवण. माणसाचं शिक्षण निसर्ग आणि निसर्गातील घटक यामधून होते हे सांगणारी ही कविता. दुसरी कविता आहे ‘निसरगाचा रंग.’ यात झाड आणि त्यांची फळ यांचं रसभरीत वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे शेवटी कवी निसर्गाला देवापेक्षा ही जास्त महत्त्व देतात-
निसरगाचा हिरा रंग, असतो समद्यामंदी
त्योच होता पाटीराका, देवायच्याबी आंदी
‘माजुरडे’ ही या कवितासंग्रहातील आंधी बोलतील तिसरी कविता. आंध आदिवासी धनाढय़ शेतकऱ्यांकडे दिवसभर कष्टाचं काम करतात. सूर्य उगवायच्या आधीपासून तर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या शेतात नि घरी काम करतात. शेतकऱ्यांची गुरंढोरं चारायचंही काम करतात. ठेकेदारांकडे खोदकामही करतात. ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. ही अंग मेहनतीची, कष्टाची कामं केल्यानंतरही त्यांना मोबदल्यात मिळतात त्या ‘आंधुरडे, माजुरडे’ अशा प्रकारच्या जातीवाचक शिव्या. एक वेळ असा होता की, निसर्ग बहरलाय. फळाफुलांनी लदबदलाय. पक्षी, प्राण्यांनी आनंदी झालाय, पण आज मात्र याच जंगलामध्ये भांडवलदार, व्यापारी घुसलेत. गावामध्ये समाजमन नासवणारे जातीवादी घुसलेत. हे वर्णन आलं आहे याच संग्रहातील ‘वखुत’ या चौथ्या कवितेत.
‘कहीपसून मनती माय’ ही पाचवी कविता मात्र या कविता संग्रहातील ‘मास्टरपीस’ म्हणून गणली जावी अशीच आहे-
कहीपसून मनती माय
पक्ख उपटेल पखरू, जीतं रहानार काय?
पंख हे पाखरांचं अस्तित्व, पाखरांची शक्ती. पण तेच छाटून टाकले तर त्यांचं अस्तित्व, त्यांची शक्ती नष्ट होणार. आज आदिवासींचंही तसंच झालंय. भाकरीच्या शोधात स्थलांतर होत आहे. आदिवासींचा प्रवाह नाकारून त्यांना मुख्य प्रवाहात ओढण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांची स्थिती पंख छाटलेल्या पाखरांप्रमाणे झाली आहे. पंख छाटलेलं पाखरू जिवंत राहणार नाही आणि राहिलं तरी त्याचं अस्तित्व शून्य असणार आहे, कोमात गेलेल्या माणसाप्रमाणे. हीच जाणीव कवी सखाराम डाखोरे ‘हूलबिगूल’ या कवितासंग्रहातून आदिवासींना करून देतात. ‘विद्रोही’ हा पर्याय निवडून आदिवासी आणि वंचितांमध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य ‘हूलबिगूल’ हा कवितासंग्रह करतो.


































































