
वरळीचे एनएससीआय डोम तुडुंब भरले, बाहेरही हजारोंची गर्दी, अद्भुत आणि अफलातून विजयी मेळावा… मराठी माणसासाठी सुवर्णक्षण, महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र लढ्याचे ऐलान… आता थांबायचं नाय..मराठी प्रेमाचा डोम गगनाला भिडला.
ठाकरे आले…त्यांना पाहिले, डोळे पाणावले, मन सुखावले!
माय मराठीसाठी ठाकरे उभे ठाकले आणि आज अवघ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. माय मराठीच्या विजयाचा ऐतिहासिक सोहळा वरळीच्या एनएससीआय डोममध्ये झाला. सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू व्यासपीठावर एकत्र आले आणि मराठीप्रेमाचा डोम जणू गगनाला भिडला. याच गर्दीच्या साक्षीने ठाकरे बंधूंनी आता थांबायचे नाही असा हुंकार देत महाराष्ट्र आणि मराठीसाठी एकत्र लढ्याचे ऐलान केले. महाराष्ट्राला भावुक करणारा हा क्षण होता. ठाकरे बंधूंना एकत्र पाहून लाखो डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. कित्येक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण झालेली पाहून अवघे मराठी मन सुखावले.
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा सुवर्णक्षण डोळय़ात साठवण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विजयोत्सव सुरू झाला. निवेदकांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या आगमनाची वर्दी दिली. हे दोन्ही बंधू व्यासपीठावर येत असताना संपूर्ण सभागृहात अंधार करण्यात आला. मात्र हा क्षण पाहण्यासाठी अधीर झालेल्या लोकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू केले. अधीरता वाढत असतानाच सभागृह पुन्हा दिव्याच्या प्रकाशाने उजळले आणि साक्षात ठाकरे बंधू व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंकडून समोर येताना दिसले. दोघांनीही जमलेल्या जनसागराला हात उंचावून, नमस्कार करून अभिवादन केले.
टाळ्यांचा कडकडाट… घोषणांचा गडगडाट
उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या खांद्यावर हात टाकला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. अवघे वातावरण भारून गेले. सारे काही डोळ्यांसमोर घडत असतानाही हा क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह लोकांना आवरत नव्हता. ठाकरे बंधू व्यासपीठावर स्थानापन्न होईपर्यंत टाळ्यांचा कडकडाट अखंड सुरू होता. घोषणा दिल्या जात होत्या. सभागृहाच्या बाहेरही तोच माहौल होता. घोषणांनी अवघा आसमंत दणाणून गेला होता.