
मुंबई महापालिका (बीएमसी) निवडणूक निकालातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 2017 मध्ये जिंकलेल्या मतदारसंघांपैकी बहुसंख्य वॉर्डवर आपला ताबा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला त्या पारंपरिक आधारात तुलनेने मर्यादित यश मिळाले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
2017 मध्ये अविभाजित शिवसेनेने जिंकलेल्या 84 वॉर्डपैकी आता 48 वॉर्डात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. , तर 18 ठिकाणी मिंधे गटातील उमदेवारांचा विजय झाला. 9 वॉर्ड भाजपकडे गेले असून उर्वरित जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि काही लहान पक्षांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या आकडेवारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने अविभाजित शिवसेनेच्या नागरी आधारापैकी निम्म्याहून अधिक हिस्सा टिकवून ठेवला असल्याचे दिसते, जरी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसली तरीही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सर्वाधिक मजबूत कामगिरी मध्य व अंतर्गत मुंबईत दिसून आली आहे—हीच क्षेत्रे पारंपरिकपणे शिवसेनेच्या राजकारणाचा कणा मानली जातात. वरळी, माहीम, शिवडी, धारावी, भायखळा आणि वांद्रे पूर्व या भागांत 2017 मध्ये अविभाजित सेनेने 23 वॉर्ड जिंकले होते. त्यापैकी आता 21 वॉर्ड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे असून उर्वरित दोन वॉर्ड मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, पक्षफुटीनंतरही अनेक वॉर्डमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना 2017 पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. उदाहरणार्थ, माहीम वॉर्ड 182 मध्ये 2017 मधील 6,899 मतांवरून 2026 मध्ये 14,248 मते मिळाली; वरळी वॉर्ड 195 मध्ये 10,811 वरून 15,562; तर वांद्रे पूर्व वॉर्ड 87 मध्ये 7,250 वरून 11,588 मतांची नोंद झाली.
हा वाढलेला मतदान पाठिंबा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेतील समन्वयाशी जोडला जात आहे, विशेषतः मराठीबहुल परिसरांमध्ये, जिथे मनसेचा पारंपरिक प्रभाव राहिला आहे. 2017 मध्ये अविभाजित सेनेच्या ताब्यात असलेले वरळीतील सर्व पाच वॉर्ड यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे गेले. माहीम आणि शिवडीतही अशीच स्थिती दिसून आली असून, शिवाजी पार्क परिसरात—जो सेनेचा वैचारिक केंद्रबिंदू मानला जातो—शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रभाव ठळक राहिला. धारावीत 2017 मधील चारपैकी तीन वॉर्ड आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहेत.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील काही भागांतही हाच कल दिसतो. जोगेश्वरी पूर्व येथे 2017 मध्ये अविभाजित सेनेने जिंकलेले चारही वॉर्ड यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे गेले असून प्रत्येक वॉर्डमध्ये मतांचा वाटाही वाढला आहे. भांडुप पश्चिम येथे चारपैकी तीन वॉर्ड यूबीटी कडे तर एक वॉर्ड मनसेकडे गेला. घाटकोपर पश्चिममध्ये एक वॉर्ड यूबीटी आणि एक मनसेकडे, तर दिंडोशीत दोन वॉर्ड यूबीटीकडे आणि एक मनसेकडे गेला.
दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेने 2017 मध्ये अविभाजित सेनेच्या ताब्यात असलेल्या 84 पैकी 18 वॉर्ड जिंकले. ही विजये मगाठाणे, अणुशक्ती नगर, वडाळा, कालीना आणि पूर्व उपनगरांतील काही भागांत विखुरलेली आहेत. मात्र वरळी, माहीम, शिवडी किंवा धारावी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांत मिंधे गटाला एकही वॉर्ड जिंकता आला नाही.
भाजप एकूण संख्येत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला, तरी त्याची वाढ दहिसर, मगाठाणे, बोरिवली, चारकोप, कांदिवली तसेच मुलुंड आणि घाटकोपरच्या काही भागांपुरती मर्यादित राहिली. 2017 मध्ये अविभाजित सेनेने अत्यल्प फरकाने जिंकलेल्या काही वॉर्डमध्ये यावेळी भाजपला अधिक मते मिळाली. तथापि, 2017 मध्ये सेनेकडे असलेल्या मध्य व अंतर्गत मुंबईतील एकाही वॉर्डमध्ये भाजपला यश मिळाले नाही.
एकूण निकाल पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवत मध्य, अंतर्गत आणि मराठीबहुल भागांत आपली पकड मजबूत केली असल्याचे स्पष्ट होते, तर शिंदे गटाची मर्यादा आणि भाजपची क्षेत्रनिहाय वाढ हा या निवडणुकीचा ठळक निष्कर्ष ठरतो.
ज्या दिवशी महानगरपालिकेचा निकाल लागला त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. अद्याप पूर्ण निकाल आले नाही म्हणून इतक्यात काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. तसेच या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचे पदाधिकारीही उपस्थित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत नव्हता, उलट त्यांच्या चेहऱ्यावर चिंताच दिसत होती.




























































