
कणकवलीमध्ये हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या श्रेया श्रीकांत लोकरे (४०, रा. कलमठ कोष्टीवाडी ) यांचा शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती अस्वस्थ बनून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १.२० वा. सुमारास घडली. श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलर्जी होती. मात्र ही बाब त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रेया लोकरे या काही दिवसांपूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कॅम्पमध्ये दाखल झाल्या होत्या. तपासणीत श्रेया यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसारच श्रेया गुरुवारी सकाळच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या.
तपासणीमध्ये श्रेया यांच्या बेंबीला सूज दिसून आली. परिणामी शस्त्रक्रिया शुक्रवारी करायचे रुग्णालयातील डॉक्टरांमार्फत ठरविण्यात आले. दुपारी सुमारास श्रेया यांना शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच श्रेया अत्यवस्थ बनल्या. त्यांच्यावर रुग्णालयातील फिजिशियन डॉक्टर्सनी तत्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलर्जी असल्याची बाब एका खासगी रुग्णालयात यापूर्वीच निदर्शनास आली होती. मात्र ही बाब श्रेया यांच्या कुटुंबियांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत श्रेया यांचे पती श्रीकांत दगडू लोकरे (कलमठ – कोष्टीवाडी) यांच्या खबर दिल्यानंतर घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्रेया यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आहे.




























































