
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत दोन्ही शहरांच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी महापौरपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर ही तारीख निश्चित करण्यात आली असून, याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता निश्चित झाली आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे जाणार असल्याचे स्पष्ट आहे. महापौर निवडीच्या दिवशी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा ६ फेब्रुवारीला होणार असून, दोन्ही शहरांना नवे नेतृत्व मिळणार आहे.
पुण्याचे ५८ वे महापौर कोण असणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत नऊ महिलांनी महापौरपद भूषवले आहे. १९९२ मध्ये काँग्रेसच्या कमल व्यवहारे या पहिल्या महिला महापौर ठरल्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोद्रे आणि मुक्ता टिळक यांनी महापौर म्हणून काम पाहिले आहे. निवडणूक निकालानंतर भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये महापौरपदासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, स्वरदा बापट यांच्यासह अनेक प्रमुख महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.
महापौर व उपमहापौरपदांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी दु. ३ ते सायं. ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.
निवडप्रक्रिया कशी होते?
- महापालिकेच्या पत्रानुसार विभागीय आयुक्त पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात.
- महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेची तारीख व वेळ जाहीर होते.
- विशेष सभेची नोटीस वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली जाते.
- इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातात.
- सभेच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत.
- एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास मतदान.
- पीठासीन अधिकाऱ्यांकडून निवडून आलेल्या महापौर व उपमहापौरांची घोषणा.
























































