
वडील डॉक्टर, स्वतचे मेडिकलचे दुकान, घरातले सर्व सुशिक्षित… वडिलांनी त्यालाही डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी मुलाला बीएचएमएसच्या शिक्षणासाठी कॉलेजात धाडले. पण मुलाला वेगळेच वेध लागले होते. तो ऑनलाइन गेमिंगच्या भलत्याच आहारी गेला. इतके की त्याने वैद्यकीय शिक्षण सोडून ऑनलाइन गेमिंगच्या आयडीसाठी चोऱ्या करायला सुरुवात केली.
तुफेल रझा अख्तर मेमन (25) असे त्या तरुणाचे नाव आहे. मूळचा धुळय़ाचा असलेला तुफेल कुटुंबीयांसोबत मुंब्य्रात राहत होता. वडील डॉक्टर तसेच घरचे वातावरण उच्च शिक्षणासाठी पोषक. त्यामुळे वडिलांनी त्याला बीएचएमएसच्या शिक्षणासाठी कॉलेजात पाठवले, पण पहिल्याच वर्षाला त्याने शिक्षणाकडे पाठ फिरवली. कारण तो ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेला होता. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी प्रत्येक स्टेजला पैशांची गरज भासते. ती रक्कम स्टेजनुसार वाढत जाते. तो पैसा आणण्यासाठी तुफेलने नको तो मार्ग निवडला. तो लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाडय़ांमध्ये प्रवाशांचे मोबाईल, दागिने चोरू लागला. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून तो आपली ऑनलाइन गेम खेळण्याची हौस पूर्ण करू लागला. 10 जुलैलादेखील त्याने कल्याण रेल्वे स्थानकात जोधपूर एक्प्रेसमध्ये सामान ठेवणाऱ्या महेंद्र पुरी या तरुणाच्या सामानामधील साईड बॅग चोरून नेली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक खेडकर, निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सपोनि अभिजित टेलर व पथकाने तपास सुरू केला.
कल्याणमध्येच मुसक्या आवळल्या
लांब पल्ल्यांच्या मेल गाडय़ांमध्ये चोऱ्या करणारा एक सराईत चोरटा कल्याण रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची खबर मिळताच टेलर व त्यांच्या पथकाने सापळा रचून तुफेल याला पकडले.त्याच्याकडून चार लाख सात हजार किमतीचे विविध कंपन्यांचे 21 चोरीचे मोबाईल फोन व एक चांदीचे पैंजण असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. केवळ ऑनलाइन गेम खेळण्यासाठी तुफेल चोरी करू लागल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































