
इंदूरमधील द्वारकापुरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. येथे एका 24 वर्षीय MBA विद्यार्थिनीची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केली आहे. पियुष धामनोदिया असे आरोपीचे नाव असून, तो पीडितेसोबतच शिक्षण घेत होता. 13 फेब्रुवारी रोजी एका भाड्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार, तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीच्या वडिलांनी 11 फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती. तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिला ब्लॅकमेल केले जात होते. तसेच आरोपीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी पियुषने हे घर भाड्याने घेतले होते. याच घरात लग्न करण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले आणि संतापलेल्या पियुषने दोरीने गळा आवळून तिची हत्या केली.हत्येनंतर आरोपीने केवळ पळ काढला आणि पनवेल येथे गेला. तिथे एका हॉटेलमध्ये मुक्काम करताना त्याने पीडितेचा आत्मा परत बोलावण्यासाठी ‘तांत्रिक विधी’ करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानंतर पनवेलवरून तो मुंबईत आला. आणि रात्रभर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करून वेळ घालवला. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माग काढत आरोपीला मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत.
उपविभागीय पोलीस आयुक्त कृष्णलालचंदानी यांनी सांगितले की, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने पीडितेचा मोबाईल फोन मुंबईत नष्ट केला आहे. पोलीस आता या प्रकरणातील डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स आणि फॉरेन्सिक रिपोर्ट गोळा करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.




























































