पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात उद्या, रविवारी सकाळी 10.30 वाजता दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात अभ्यास केंद्राच्या वतीने जाहीर सभा घेण्यात येणार आहे. मराठी, महाराष्ट्रावरील हिंदीच्या आक्रमणाविरोधात अभ्यासक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकवटण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकारने पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. याला विरोध झाल्यानंतर हिंदी अनिवार्य नसेल असे शासनाच्या वतीने तोंडी सांगण्यात आले. मुळात पाचवीपर्यंत तिसरी भाषाच नको अशी मागणी असताना हिंदी अनिवार्य नसेल असे मानभावीपणे सांगणे ही मराठी भाषकांची दुहेरी फसवणूक आहे. म्हणजे मुलांना पहिलीपासून तिसरी भाषा शिकावीच लागणार आणि तीही परिस्थितीजन्य कारणांमुळे हिंदीच असणार आहे, असा अभ्यासकांचा आक्षेप आहे. तिसऱया भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेण्याबाबत शासन टाळाटाळ करीत आहे, असे मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी सांगितले.