
मध्य रेल्वेने रविवारी घेतलेल्या पाच तासांच्या मेगाब्लॉकमुळे लोकल प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान धिम्या लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना जलद मार्गावरील स्थानकांवर धावाधाव करावी लागली. ब्लॉकमुळे धिम्या गाडयांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
रविवारी सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉकच्या पाच तासांच्या अवधीत सर्व धिम्या गाड़य़ा जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्या गाडय़ा विद्याविहारपर्यंत भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि पुर्ला या सहा स्थानकांवरच थांबल्या. उर्वरित स्थानकांवरील प्रवाशांना गाडय़ा पकडण्यासाठी जलद गाडय़ांचा थांबा असलेल्या स्थानकांत धावाधाव करावी लागली. यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची प्रचंड गैरसोय झाली.
























































