पाचवी-आठवी शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी रखडली; विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप राज्य तसेच जिल्हास्तरावरील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष यांच्याकडे गुणवत्ता यादी त्वरित जाहीर करण्याची मागणी केली आहे.

या मागणीसंदर्भात संघाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले आहेत. त्यांची, त्यांच्या पालकांची आणि शिक्षकांची गुणवत्ता यादीबाबत मोठी अपेक्षा आहे. गुणवत्ता यादी वेळेत जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनेचे म्हणणे आहे की, जर यादी जास्त विलंबाने जाहीर झाली, तर विद्यार्थ्यांचे औत्सुक्य संपून अपेक्षित आनंदच त्यांना मिळणार नाही. त्यामुळे वेळ न घालवता ही यादी तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.