काळजी घ्या… पारा चाळिशीवर जाणार, मुंबईला तीव्र उष्णतेचा ‘यलो’ अलर्ट! अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा

वातावरणातील बदलामुळे रात्री थंडी आणि दिवसा उकाडा यामुळे मुंबईकर हैराण झाले असताना आता मुंबईत पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांनी समुद्री वाऱ्यांचा वेग रोखल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. पुढील दोन दिवस ही स्थिती राहणार असून राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने खबरदारीचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रपृतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबई-ठाण्यासह रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट धडकणार आहे. प्रखर ऊन आणि उकाडय़ामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात.लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्प करावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

असा करा बचाव

  • उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
  • दुपारी 12 ते सायं. 4 वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा.
  • घराबाहेरील कामे सकाळी 10 वाजेच्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर करा.
  • पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश/उन्हाला टाळावे.
  • पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळपाणी असे द्रवपदार्थ घ्या.
  • उन्हात चप्पल न घालता / अनवाणी चालू नये,  चहा, कॉफी इत्यादी गरम पेये टाळावीत.