Rain Alert – पुणे आणि सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुण्यात पावसाचे थैमान अजूनही सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाणी पातळी वाढत आहे. यामुळे खडकवासला, पवना, चासकमान आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पुणे पुन्हा पाण्याखाली येण्याची चिन्हे आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस जर असाच सुरु राहिला तर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे कोयनाकाठच्या गावांना तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच नागरिकांनी सतर्क रहावे, काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.

सध्या खडकवासला धरणातून 27 हजार 16 क्युसेक, मुळशी धरणातून 27 हजार 609 क्युसेक, पवना धरणातून 5 हजार क्युसेक, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक आणि कोयना धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता अजित पवार यांनी पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा आढावा घेतला.