
उत्तनच्या निसर्गरम्य डोंगरावर उभारण्यात येणारे मेट्रो कारशेड अखेर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे १५ हजार झाडांचा जीव वाचणार असून या निर्णयाचे निसर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. मेट्रो कारशेडमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार होती. पण स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमींनी वारंवार केलेल्या आंदोलनामुळे एमएमआरडीएला माघार घ्यावी लागली. आता कारशेड उभारले जाणार नसल्याने मुर्धा व राई ही दोन स्थानकेदेखील रद्द झाली आहेत.
दहिसर ते भाईंदर पश्चिम या मार्गावर मेट्रोचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. त्यासाठी उत्तन परिसरातील डोंगरी येथे मेट्रो कारशेडचा प्रस्ताव होता. त्या भागामध्ये अनेक मोठे वृक्ष व दुर्मिळ झाडेदेखील आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भाईंदरमधील सर्व संस्था एकटवल्या आणि मेट्रोचे कारशेड रद्द करावे यासाठी मोठे जनआंदोलन उभारले. सह्यांची मोहीम, मानवी साखळी याबरोबरच सरकारकडे अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला. त्यानंतर सरकारला मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला.
दोन रॅम्पमुळे खर्च
वाचणार भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळच मेट्रो समाप्त होत आहे. मेट्रो मार्गाला दोन ठिकाणी रॅम्प उभारण्यात येणार आहेत. या रॅम्पवरून मेट्रो जाणार असल्याने डोंगरी येथे मेट्रो कारशेड बांधण्याची आवश्यकता राहणार नाही. कारशेडसाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच झाडांची कत्तल देखील होणार नाही. पर्यावरणाचे नुकसानदेखील होणार नाही.
दहिसर ते भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे मेट्रोचे काम सुरू करण्यात आले होते. कारशेड उभारणे आवश्यक असल्याने बोस मैदानाच्या बाजूला असलेली खाजगी व शासकीय जागा सोडून मोर्वा गावालगत कारशेड उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला.
या निर्णयाला गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे कारशेडसाठी डोंगरी गावातील सरकारी जागेची निवड करण्यात आली होती. तेव्हापासूनच स्थानिक गावकरी व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.
स्थानिकांचा आक्रमक पवित्रा
मेट्रो कारशेडला विरोध करूनही सरकारने डोंगरी येथील सरकारी जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरदेखील केली. एवढेच नव्हे तर एमएमआरडीएने कारशेड उभारणीची निविदा प्रक्रियादेखील राबवली. काही झाडेही तोडली. सरकारच्या या कृतीमुळे ग्रामस्थ आणखीनच भडकले व त्यांनी पुन्हा मोठे आंदोलन छेडले. स्थानिकांचा आक्रमक पवित्रा व टोकाचा विरोध लक्षात घेऊन अखेर कारशेड उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने रद्द केल आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.



























































