मेट्रोने आरे ते वरळी नॉनस्टॉप प्रवास सुरू…

मेट्रो-3 चा दुसरा टप्पा शनिवारी सकाळपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला असून आता आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा गारेगार प्रवास भूमिगत मेट्रोने अवघ्या 60 रुपयांत करता येणार आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आरे ते वरळी या मार्गावर 26,758 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती आहे. मेट्रो-3 मार्गावर सोमवार ते शनिवारी पहिली मेट्रो सकाळी 6.30 वाजता तर शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता असणार आहे. रविवारी सकाळी पहिली मेट्रो सकाळी 8.30 वाजता तर शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता असणार आहे. मेट्रो-3 च्या दुसऱया टप्प्यात बीकेसी, धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. मेट्रो-3 चा वरळी ते कुलाबा हा शेवटचा टप्पा ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत येईल. वरळीतून फिनिक्स मॉलला जाणे सोयीचे व्हावे यासाठी मॉलतर्फे वरळी मेट्रो स्थानकावरून गाडय़ांची सोय करण्यात आली आहे. यासाठी मॉलकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार करण्यात आला आहे