म्हाडाच्या 173 दुकानांसाठी आतापर्यंत 600 अर्ज

म्हाडाने मुंबई शहर आणि उपनगरातील 173 दुकानांच्या ई-लिलावासाठी मार्च महिन्यात जाहिरात काढली. दुकानांसाठी आतापर्यंत जवळपास 600 जणांनी अनामत रकमेसह अर्ज भरले आहेत, मात्र ई-लिलावाची तारीख कधी जाहीर होणार, याकडे आता अर्जदारांचे डोळे लागले आहेत.

घरांसोबत म्हाडातर्फे दुकानेदेखील बांधण्यात येतात. अशा विविध योजनाअंतर्गत बांधलेल्या मालाड, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 173 दुकानांची विक्री म्हाडा करणार असून यात मालवणी येथील सर्वाधिक 57 दुकानांचा समावेश आहे. 80 लाखांपासून 14 कोटी रुपयांपर्यंत या दुकानांच्या किमती आहेत. सुरुवातीला ई-लिलावासाठी 19 मार्चला बोली लागणार होती, मात्र आचारसंहितेमुळे दुकानांचा लिलाव 6 जूनपर्यंत पुढे ढकलला. दोन महिने अनामत रक्कम अडकल्याने दुकानांचा लिलाव कधी होणार, असा सवाल अर्जदार विचारत आहेत.

आचारसंहितेनंतर लिलावाला मुहूर्त?

दरम्यान, लिलावाबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाला विचारणा केली असता साधारण पुढच्या आठवडय़ात लिलाव होईल, अशी माहिती त्यांनी दिली. लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुन्हा आचारसंहिता लागली आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच दुकानांच्या लिलावाला मुहूर्त मिळेल अशीदेखील कुजबुज आहे.