
वांद्रे रिक्लेमेशन, वरळी आदर्श नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर या मुंबईतील तीन महत्त्वाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही प्रकल्पांचा कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट (सी अॅण्ड डीए) पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल साडेसहा हजार रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
वांद्रे रिक्लेमेशन, वरळी आदर्श नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील पुनर्विकास अनेक वर्षे रखडला होता. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर अखेर म्हाडाच्या माध्यमातून खासगी विकासकाची नियुक्ती करून हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन प्रकल्पात 1147, आदर्श नगर प्रकल्पात 863 आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील 4584 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. पुनर्विकासासाठी विकासकांना 11 मेपर्यंत निविदा सादर करता येईल.
म्हाडाला मिळणार लॉटरीसाठी घरे
निविदेनुसार, म्हाडाने वांद्रे रिक्लेमेशन येथे 61,498 चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ किंवा 1,817 कोटी रुपयांच्या प्रीमियमची मागणी केली आहे. वरळीच्या आदर्श नगर येथे 23,281 चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ किंवा 768 कोटी प्रीमियमची तर अंधेरीच्या सरदार वल्लभभाई पटेल नगर येथे 74,760 चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळाची मागणी केली आहे. म्हाडाला जास्तीत जास्त गृहसाठा किंवा प्रीमियम देण्याची तयारी दाखवणाऱया विकासकाची म्हाडाकडून नियुक्ती करण्यात येणार आहे.
असे असणार प्रस्तावित भाडे
रहिवाशांना त्यांच्या घराच्या आकारमानानुसार विकासकाकडून घरभाडे आणि कॉर्पस फंड देण्यात येणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन येथील रहिवाशांना 45 हजार ते 1 लाख रुपये भाडे आणि 17 ते 40 लाखांपर्यंत कॉर्पस फंड देण्यात येणार आहे. आदर्श नगर येथील रहिवाशांना 35 हजार ते 85 रुपये भाडे आणि 18 ते 45 लाखांपर्यंत कॉर्पस फंड देण्यात येणार आहे.
म्हाडाचा आज लोकशाही दिन
– म्हाडाचा लोकशाही दिन सोमवार, 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक रहिवाशांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जानेवारी 2024 पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱया सोमवारी म्हाडा मुख्यालय सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.




























































