म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माणमंत्री उद्या निर्णय घेण्याची शक्यता

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या कोट्यवधींमध्ये असलेल्या किमती पाहून सर्वसामान्य अर्जदार चक्रावले आहेत. अवाच्या सवा किमतीमुळे इच्छुकांनी लॉटरीकडे पाठ फिरवली असून म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी जोर धरू लागलीय. अशातच म्हाडाच्या शुभंकर (मॅस्कॉट) चिन्हाच्या अनावरणासाठी बुधवारी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हाडा मुख्यालयात येणार आहेत. यावेळी घरांच्या किमती कमी करण्याबाबत ते निर्णय जाहीर करणार का, याकडे सर्वसामान्य अर्जदारांचे डोळे लागले आहेत.

म्हाडाने  मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज नोंदणी स्वीकृतीला सुरुवात केली असून अगदी 29 लाखांपासून ते 7 कोटी 57 लाख रुपयापर्यंतच्या या घरांच्या किमती आहेत. विशेष म्हणजे, 33(5) आणि 33(7) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून खासगी विकासकांकडून  म्हाडाला मिळालेल्या 370 घरांचाही यात समावेश आहे. या घरांच्या किमती पाहून म्हाडा सर्वसामान्यांची चेष्टा करतेय की काय असे वाटू लागलेय. अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील फ्लॅटची किंमत तब्बल 2 कोटी 62 लाख रुपये ठेवल्यामुळे सर्वसामान्यांना अशी महागडी घरे परवडणार कशी? इतक्या कमी पगारात बँका तरी त्यांना कर्ज देणार का, असे सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही घरे प्रतिसादाअभावी धूळखात पडण्याची शक्यता आहे.

प्राधिकरणाकडून चाचपणी सुरू

घरांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अलीकडेच दिले होते. सध्या 33(5) आणि 33(7) अंतर्गत म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती रेडिरेकनरच्या 110 टक्के दराने आकारल्या जातात. त्यात काही बदल करता येईल का, यादृष्टीने अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱयांना दिल्या होत्या. त्यामुळे याच लॉटरीपासून या घरांच्या किमती कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल का, याकडे अर्जदारांचे डोळे लागले आहेत विधानसभा निवडणुकांसाठी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे म्हाडाच्या अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीलादेखील मुदतवाढ मिळू शकते.

आतापर्यंत फक्त 22 हजार अर्ज

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरावर अक्षरशः अर्जदारांच्या उडय़ा पडतात. यंदा मात्र उलटे चित्र दिसतेय. 17 दिवसांत फक्त 22 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 14 हजार 583 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. गेल्या वर्षी म्हाडाने चार हजार घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी तब्बल सवा लाख अर्ज प्राप्त झाले होते.