म्हाडाकडून उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण सुरू, पुढील महिन्यात धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मंडळातर्फे मे महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाणार आहे.

जुन्या आणि जीर्ण झालेल्या उपकरप्राप्त इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. आर्किटेक्ट आणि डेप्युटी इंजिनीअर यांच्याकडून गेल्या आठवडय़ापासून इमारतींच्या पाहणीला सुरुवात झाली आहे. पाहणीत एखादी इमारत धोकादायक आढळली की तिचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. ऑडिटच्या रिपोर्टनुसार इमारतीची दुरुस्ती करायची की इमारत धोकादायक म्हणून जाहीर करायची हे ठरवले जाते.

रहिवाशांना संक्रमण शिबिराऐवजी भाडय़ाचा पर्याय 

अतिधोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात म्हणून म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना इशारा नोटीस दिल्या जाणार आहेत. तसेच या रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत म्हाडाकडे संक्रमण शिबिरे शिल्लक नसल्यामुळे गेल्या वर्षीपासून दरमहा 20 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय गेल्या वर्षीपासून रहिवाशांना देण्यात आला आहे.