
भाडय़ाने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार आहे. म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाडय़ाने घरेही उपलब्ध करून देणार आहे. यासाठी नो ब्रोकर, मॅजिकब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा लवकरच स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे. पोर्टल तयार करण्यासाठी म्हाडाने प्रसिद्ध केलेल्या स्वारस्य निविदेला तब्बल 17 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.
केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाने म्हाडाला भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या घरांचे धोरण (रेंटल पॉलिसी) तयार करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल तयार करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात भाडेतत्त्वावर घरे घेता यावीत म्हणून म्हाडाकडून पोर्टल तयार करण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहे. त्यानुसार सध्या स्वारस्य दाखवलेल्या 17 कंपन्यांपैकी ज्यांची निविदा योग्य असेल त्यांना काम दिले जाणार आहे. निवड झालेल्या कंपनीला सहा महिन्यात पोर्टल तयार करून म्हाडाला सुपूर्द करावे लागणार आहे.
एजंटपासून होणार सुटका
म्हाडाच्या या पोर्टलमुळे नागरिकांना घर भाडय़ाने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी आता दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. केवळ नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
विविध प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर
भाडेकरू व्यवस्थापन, देखभाल नोंदी, उपलब्ध घरांची माहिती, भाडेकरार, पोलीस व्हेरिफिकेशन, स्टॅम्प डयुटी व नोंदणी या प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यामुळे महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर घर घेणे अधिक सोपे, सुरक्षित आणि परवडणारे होणार आहे.



























































