
– गणेश पुराणिक
इंडियन प्रीमियर लीगच्या एकोणिसाव्या हंगामाची सुरुवात 28 मार्च पासून होत आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना घरच्या वानखेडे मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे. रविवारी 29 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने फॅन्ससोबत कनेक्ट होण्यासाठी द मिक्स या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूंनी फॅन्ससोबत मनमुराद आनंद लुटला.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या कार्यक्रमात कर्णधार हार्दिक पंड्या, माजी कर्णधार रोहित शर्मा आणि टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होते. स्टेजवर स्मोक गनसह मजा करताना आणि फॅन्ससोबत फोटो घेताना हे खेळाडू दिसले. हा कार्यक्रम मुंबई इंडियन्सकडून पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता.

क्रिकेट, संगीत आणि खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळाला. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर जगविख्यात संगीतकारांना ऐकण्याची, त्यांच्या तालावर थिरकण्याची संधीही चाहत्यांना मिळाली. तसेच चाहत्यांना मुंबई इंडियन्स संघाची जर्सीही आपल्या नावासह छापून घेण्याची संधी मिळाली.

बीकेसी येथे आयोजित या कार्यक्रमात वेगवेगळे फूड स्टॉल, गेम झोन देखील बनवण्यात आले होते. या ठिकाणी चाहत्यांना गेम खेळून मुंबई इंडियन्सशी निगडित कॅप, टी-शर्ट, किचन जिंकण्याची संधी मिळाली. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी याचा मनमुराद आनंद लुटला.

याठिकाणी मुंबई फ्रेंचायजी जगभरात ज्या लीगमध्ये खेळते तिथे जिंकलेल्या ट्रॉफी देखील ठेवण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात मुंबईकडून खेळणाऱ्या खेळाडूंची जर्सी तिथे ठेवण्यात आली होती. खेळाडूचे नाव, त्याची साईन आणि खाली तो खेळाडू मुंबईकडून कोणत्या हंगामात खेळला हे नमूद करण्यात आले होते.

सहाव्यांदा IPL जिंकण्याचे लक्ष्य – हार्दिक पंड्या
या कार्यक्रमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यांनी आपला क्रिकेटचा प्रवासही सांगितला. सुरुवातीला आपण फक्त बॅटर होतो, मात्र कालांतराने यात बदल करत बॉलिंगही करू लागलो आणि अष्टपैलू म्हणून उदयास आलो, असे हार्दिकने सांगितले. तसेच त्याने यंदा सहाव्यांदा आयपीएल चषक जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्सच्या स्क्राउटिंग टीमचे कौतुक केले.

मी रोहित शर्माचा खूप मोठा चाहता! – डिव्हाईन
मुंबईचा प्रसिद्ध रॅपर डिव्हाइन याने आयपीएलपूर्वी आयोजित ‘मुंबई इंडियन्स फॅन फेस्टिव्हल’मध्ये हिटमॅन रोहित शर्माबद्दल आपले प्रेम व्यक्त केले. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड गार्डन येथे आयोजित ‘द मिक्स’ या मुंबई इंडियन्स फॅन फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी डिव्हाइनने सादरीकरण केले. वेगवेगळी गाणी सादर केल्यानंतर, चाहत्यांशी संवाद साधताना तो म्हणाला, मी रोहित शर्माचा खूप मोठा चाहता आहे. डिव्हाईन यांच्यासह पहिल्या दिवशी ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड यानेही सादरीकरण केले. तसेच प्रसिद्ध डीजे न्यूक्लिया याने आपल्या हिट गाण्यांनी पहिला दिवस गाजवला.
























































