
मायक्रोसॉफ्टने अलीकडेच तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. त्यात सॉफ्टवेअर अभियंत्यांची संख्या मोठी आहे. या अभियंत्यांनी एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलीजंस यंत्रणा तयार केली. परंतु या एआयनेच या अभियंत्यांच्या नोकऱ्या गिळल्याचे धक्कादायक वास्तव ब्लुमबर्गने समोर आले आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना एआय टूल्सचा सर्वाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. परंतु आता या एआय टूल्सनेच कर्मचाऱ्यांची जागा घेतल्याचे चित्र आहे.
कंपनी अधिक कार्यक्षम आणि कुशल बनवण्यासाठी आणि व्यवस्थापनातील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे. वॉशिंग्टनमध्ये कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक अभियंते होते. मात्र विक्री आणि मार्केटिंग विभागात कर्मचाऱ्यांची कपात तुलनेने कमी होती. म्हणजेच कमीत कमी गुंतवणूक आणि एआयमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक हे कंपनीचे उद्दिष्ट होते, अशी माहिती समोर आली आहे.
कंपनीतील काही प्रकल्पांमध्ये कंपनीच्या कोडचा जवळपास 30 टक्के भाग एआय बनवते. त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली, ही बाब मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनीही स्वीकारली आहे.
मायक्रोसॉप्टने इस्रायलला गाझामध्ये हल्ले करण्यासाठी मदत केल्याचे मायक्रोसॉफ्टने मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीविरोधात प्रचंड संताप आहे. मायक्रोसॉफ्टच्या बिल्ड 2025 या कार्यक्रमात कर्मचारी जो लोपेजने सीईओ सत्या नडेला यांच्या भाषणात अडथळा आणून फ्री पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या होत्या.