
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा थेट फटका क्रीडा जगताला, विशेषतः फुटबॉलला बसू लागला आहे. प्रादेशिक अस्थिरता आणि सुरक्षेच्या कारणास्तव हवाई क्षेत्रावर लादलेल्या निर्बंधांमुळे अनेक स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आशियाई क्लब स्पर्धांपासून ते स्थानिक लीगपर्यंत अनेक सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. खेळाडूंचा प्रवास, संघांची सुरक्षा आणि आयोजनातील अडचणींमुळे सध्या फुटबॉलच्या मैदानावर युद्धाचे सावट स्पष्टपणे दिसून येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संकटाचा सर्वाधिक परिणाम आशियाई फुटबॉल महासंघाच्या (AFC) स्पर्धांवर झाला आहे. ‘AFC चॅम्पियन्स लीग एलिट’च्या पश्चिम विभागातील बाद फेरीच्या सामन्यांसह ‘AFC चॅम्पियन्स लीग टू’ आणि ‘AFC चॅलेंज लीग’मधील अनेक लढती अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेल्या आहेत. विशेषतः सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि इराणमधील क्लब या तणावामुळे थेट प्रभावित झाले आहेत. यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश असलेल्या ‘अल-नासर’ (Al-Nassr) यांसारख्या हाय-प्रोफाइल क्लबच्या सामन्यांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरासोबतच संबंधित देशांमधील स्थानिक फुटबॉल लीगवरही याचे पडसाद उमटले आहेत. कतार आणि इराणमध्ये सुरक्षा खबरदारी म्हणून अनेक स्थानिक सामने स्थगित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा किंवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. फुटबॉल पूर्णपणे थांबला नसला तरी, खेळाडू आणि चाहत्यांमध्ये भीतीचे कायम आहे, ज्यामुळे खेळाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
क्लब फुटबॉलव्यतिरिक्त मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांनाही या परिस्थितीचा फटका बसला आहे. 27 मार्च रोजी कतारच्या लुसैल स्टेडियमवर स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘फायनलिसीमा’ (Finalissima) सामन्याच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याव्यतिरिक्त, विविध राष्ट्रीय संघांचे सामने आणि पात्रता फेऱ्यांवरही प्रवास निर्बंधांमुळे गंडांतर आले आहे. मध्य आशिया हा जगातील प्रमुख विमान वाहतूक हब असल्याने, हवाई मार्ग बंद झाल्यामुळे खेळाडूंना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे, जे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.
युद्ध आणि खेळाचा असा संघर्ष यापूर्वीही पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे 1938 नंतर थेट 1950 मध्ये फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. तर 1991 च्या आखाती युद्धातही अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. जर हा तणाव दीर्घकाळ टिकला, तर आशियाई फुटबॉलचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडून पडण्याची शक्यता आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

























































