पाकिस्तानला गुडघ्यावर आणणारे मिग-21 घेणार निरोप, 62 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त

1965, 1971, 1999 च्या युद्धात पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर आणणारे मिग-21 हे लढाऊ विमान हिंदुस्थानी हवाई दलाचा निरोप घेणार आहे. 62 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर हे विमान निवृत्त होत आहे. 2019 च्या लष्करी कारवायांमध्येही या लढाऊ विमानाचा सहभाग होता. सप्टेंबरमध्ये रशियन बनावटीच्या मिग-21 लढाऊ विमानाला चंदिगड एअरबेसवर निरोप देण्यात येणार आहे.

या लढाऊ विमानाचा 1963 मध्ये हवाई दलात समावेश करण्यात आला. मिग-21 हे एक सिंगल पायलट लढाऊ विमान आहे. हवाई दलाने 1960 मध्ये पहिल्यांदा मिग-21 विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. सोव्हिएत रशियाच्या मिकोयान गुरेविच डिझाइन ब्युरोने 1959 मध्ये त्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. हे 18 हजार मीटर उंचीवर उडू शकते. क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब वाहून नेण्यास ते सक्षम आहे.

कमाल वेग 2,230 किलोमीटर

या विमानाचा कमाल वेग ताशी तब्बल 2,230 किलोमीटर म्हणजेच 1,204 नॉट्सपर्यंत आहे. 1965 आणि 1971 च्या हिंदुस्थान-पाक युद्धात मिग-21 विमानांचा वापर करण्यात आला होता. रशियाने बनवलेल्या या विमानात अनेक त्रुटी असल्याने ते क्रॅश होत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हे विमान रशियाने 1985 मध्ये निवृत्त केले होते.

अभिनंदन वर्धमान यांचे विमानही कोसळले होते

2019 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे मिग 21 मधून खाली पडले होते. ते थोडक्यात बचावले होते. पाकिस्तान एफ 16 लढाऊ विमानावर त्यांनी क्षेपणास्त्रे डागली. मिग 21 वरदेखील क्षेपणास्त्रे डागली गेली. या झटापटीत मिग-21 कोसळले आणि वर्धमान पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते.

2012 पर्यंत निम्मी विमाने कोसळली, अनेकांना जीव गमवावा लागला

2012 पर्यंत हिंदुस्थानच्या 872 मिग विमानांच्या ताफ्यातील जवळपास निम्म्या विमानांचा अपघात झाला होता. 2003 ते 2013 या कालावधीत म्हणजेच 10 वर्षांत 38 मिग-21 विमाने कोसळली. 1970 पासून आतापर्यंत हिंदुस्थानी हवाई दलाचे 180 हून अधिक वैमानिक मिग विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडले, तर 40 नागरिकांनाही जीव गमवावा लागला.