
मुंबईतील गोवंडी आणि मानखुर्द परिसरात मुलं पळवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यामागे प्रसूतिगृहातील माहिती फोडणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा खळबळजनक मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधताना त्यांनी थेट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, मुलं पळवणाऱ्या टोळ्या प्रसूतिगृहांमधून (Maternity Homes) थेट माहिती मिळवत आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडूनच ही गोपनीय माहिती बाहेर पाठवली जात असून, यात रजिस्ट्रेशन सिक्रसीचा भंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालयातील स्टाफ या टोळ्यांना सामील असल्यामुळेच मुले पळवण्याचे धाडस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. यातच सरकार रजिस्ट्रेशन सिक्रसीबाबत काही निरबंध आणणार का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
दरम्यान, गोवंडी-मानखुर्द पट्ट्यातील पालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून, प्रसूतीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेईपर्यंतच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षा असावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
























































