
महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासंदर्भात अन्यायकारक शासन निर्णय जारी केला होता. त्या निर्णयाचा विरोध दर्शवण्यासाठी संयुक्त मराठी मुंबई चळवळच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी शनिवार, 15 मार्च रोजी काळा दिवस पाळला. गेल्या वर्षभरात सातत्याने शेकडो आंदोलने करूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने गिरणी कामगार संतप्त आहेत. शेलू-वांगणीत घरे बांधून गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घालवण्याचा सरकारचा डाव आहे. या पार्श्वभूमीवर ‘शेलू-वांगणीत घरे नको, मुंबईतच घरे द्या’ अशा जोरदार घोषणा देत सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. सभेदरम्यान संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे सरचिटणीस गोपाळ शेलार, सचिव रवींद्र गवळी आणि प्रमुख कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांनी काळय़ा फिती आणि बॅनर दाखवत हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.