
सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गिरणी कामगारांना घरे दिली नाहीत तर आम्हीच मुंबईत जिथे जागा उपलब्ध होईल तिथे झोपड्या बांधू, असा इशारा संयुक्त मराठी मुंबई चळवळीने सरकारला दिला आहे.
संयुक्त मराठी मुंबई चळवळ या गिरणी कामगार संघटनेतर्फे गिरणी कामगार आणि वारसांची मासिक सभा रविवारी पार पडली. यावेळी गिरणी कामगारांनी राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. 9 जुलै रोजी आझाद मैदानात गिरणी कामगार एल्गार महामोर्चा झाला. त्यानंतर 10 जुलै रोजी गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेना उपनेते, आमदार सचिन आहिर यांच्या नेतृत्वात 14 संघटनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते. येत्या 15 दिवसांत मुंबईत गिरणी कामगाराच्या घरासाठी कुठे कुठे जागा उपलब्ध होऊ शकते हे तुम्हाला आम्ही सांगू, असे आश्वासन त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आले. आता 60 दिवस होऊनही सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याबद्दल गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीला संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे विवेकानंद बेलूसे, रमाकांत बने, हरीश करगळ, श्याम कबाडी, रवींद्र गवळी, सुद्रिक, शिवराम जाधव, प्रज्ञा कदम, सविता गुरव, स्नेहा सावंत, मानसी कदम आदी उपस्थित होते.