
ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतच्या कथित व्हिडीओमुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ चांगलेच अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असतानाच पक्षाकडूनदेखील जोपर्यंत या प्रकरणात तुम्हाला क्लिन चीट मिळत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहून नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज झालेल्या कॅबिनेटला झिरवळ यांनी दांडी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले त्याच दिवशी सायंकाळी मंत्री नरहरी झिरवळ यांचा ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तेव्हापासून झिरवळ समोर आले नाहीत. अधिवेशन संपल्यानंतर बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीला उपस्थित राहणे झिरवळ यांनी टाळले. तशा सूचना त्यांना अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच देण्यात आल्या आहेत.
फोनवरून सुनेत्रा पवारांकडे बाजू मांडली
मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्री झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पह्न करून कथित व्हिडीओप्रकरणी स्वतःची बाजू मांडली. त्यात त्यांनी या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसल्याचा दावा केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.


























































