
यूट्युबवर पाहून वेटलॉससाठी डाएट करणं एका अल्पवयीन मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाएटच्या नावाखाली तीन महिने केवळ ज्यूसचे सेवन केले. कथित डाएटमुळे 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील कोलाचेल येथे ही घटना उघडकीस आली आहे.
शक्तीस्वरन असे मयत मुलाचे नाव आहे. शक्तीसरनचे वजन खूप होते. यामुळे शाळेत क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेत नव्हता. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शक्तीस्वरनने आधी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्तीस्वरनने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय यूट्युब पाहून वजन कमी करण्यासाठी डाएट सुरू केला.
यूट्युबवर दाखवल्याप्रमाणे शक्तीस्वरन गेले तीन महिने फक्त फळांचा ज्यूसचे सेवन घेत होता आणि व्यायाम करायचा. यामुळे त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. तीन महिन्यांनंतर गुरुवारी अन्न सेवन करताच शक्तीस्वरनला उलट्या होऊ लागल्या, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो कोसळला. काही वेळात त्याला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी डाएटमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच शक्तीस्वरनचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला याचा उलगडा होईल.