मालमत्ता कराचे 127 कोटी जमा करायचे कसे? कर्मचाऱ्यांची दमछाक, निवडणुकीच्या कामात जुंपल्याने वसुलीचा बोऱ्या उडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका निवडणुकीसाठी सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी महिनाभर निवडणुकीच्या कामात जुंपले होते. मात्र यामुळे मालमत्ता कर वसुलीचा पुरता बोऱ्या उडाला असून आता निवडणूक संपताच या कर्मचाऱ्यांवर कर वसुलीचा अतिरिक्त बोजा पडला आहे. यंदा महापालिकेने ३३४ कोटी ६८ लाखांत रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. परंतु आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक राहिले असून तब्बल १२७ कोटी वसुली बाकी आहे. ही कर वसुली करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे.

२०२४-२५ आर्थिक वर्षात मीरा भाईंदर महापालिकेने धारकांकडून २४१ कोटी ५९ लाख रुपयांचा कर वसूल केला होता. त्यानुसार महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ३३४ कोटी ६८ लाखांच्या कर वसुलीचे टार्गेट ठेवले होते. मात्र २८ जानेवारीपर्यंत फक्त २०७ कोटी २८ लाख ४७ हजार एवढीच कर वसुली झाली आहे. त्यामुळे अजून १२७कोटींचे टार्गेट पूर्ण करणे कर्मचाऱ्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सर्व प्रभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील प्रभाग निहाय मालमत्ता कर वसुली, विभाग निहाय स्थिती, निश्चित उद्दिष्टांच्या तुलनेत झालेली प्रगती व मागील वर्षाच्या तुलनेत वाढ या सखोल विषयांचा आढावा घेण्यात आला.

कार्यपद्धती सक्षम करण्याचे आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्तांनी कर वसुलीची कार्यपद्धती अधिक सक्षम, पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी क्षेत्र निहाय कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ऑनलाइन सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवा, वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करा, थकबाकीदारांना नोटिसा बजावून जप्तीची कारवाई करा, असे आदेशदेखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.