
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे खापर शिंदे गटाने थेट भाजपवर फोडले आहे. मीरा-भाईंदर शहरात निवडणुकीआधी मुद्दामहून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यात आला. निवडणुकीत हा वाद वाढवून भाजपला फायदा झाल्याचा स्पष्ट आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांच्या आरोपामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
पालिका निवडणुकीत शिंदे गटाचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयातील आढावा बैठकीनंतर सरनाईक यांनी शिंदे गटाच्या पराभवाचे विश्लेषण केले. त्यांनी शिंदे गटाच्या पराभवाला भाजपला जबाबदार धरले. मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे भाजपचा विजय झाला असे म्हणत त्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी विजयाचे श्रेय घेऊ नये असा अप्रत्यक्ष टोला हाणला. जातीय तेढ निर्माण झाली नसती तर पालिका निवडणुकीचा निकाल वेगळा असता असेही ते म्हणाले.
पराभवाचे खापर मतदारांवर फोडले
शिंदे गटाने मीरा-भाईंदर शहरात केलेल्या विकासकामांचे मुद्दे मतदारांसमोर मांडले. हे मुद्दे नागरिकांसमोर पोहोचले नाहीत किंवा नागरिकांना ते समजले नाहीत त्यामुळेच शिंदे गटाचा पराभव झाला असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी पराभवाचे खापर अप्रत्यक्ष मतदारांवर फोडले.





























































