
मिरजेतील मंगळवार पेठ परिसरात असलेल्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलघुटगी(वय 26, रा. मंगळवार पेठ, मिरज) या तरुणाचा धारदार शस्त्र्ााने हल्ला करून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. वर्चस्व वादातून खून झाल्याची चर्चा आहे.
निखिल विलास कलघुटगी याच्यावर शनिवारी (दि. 27) सायंकाळी गणेश तलावाजवळच्या फुटपाथवर जमावाने धारदार शस्त्र्ााने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी (दि. 28) त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान निखिल याचा मृतदेह ताब्यात घेण्यात त्यांच्या नातेवाइकांनी नकार दिला. जोपर्यंत निखिलच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. यादरम्यान शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांची, नातेवाइकांची बाजू ऐकून घेत सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली. त्यानंतर निखिल याचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद, प्रतीक चव्हाण या चारजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला. यापैकी प्रतीक चव्हाणसह तीनजणांना अटक केली आहे. यादरम्यान मयत निखिल याच्या नातेवाईकांनी निखिल याच्या खूनप्रकरणामध्ये सलीम पठाण गणेश कलघुटगी, चैतन्य कलघुटगी यांचाही समावेश असून, त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.
वर्चस्ववादातून निखिल कलघुटगी याचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी एका हल्ल्यात निखिल याने त्याचा भाऊ रोहन याला मदत केली होती. याचा राग मनात ठेवून आरोपींनी निखिल याची हत्या केल्याचे उघडकीस येत आहे. प्रथमेश ढेरे, सरफराज सय्यद, प्रतीक चव्हाण हे सराइत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. काही अल्पवयीन मुलांचा खून प्रकरणात समावेश असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.