
थंडीची चाहूल लागताच गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ही गर्दी वाढत असतानाच गोव्यातील दोन बीचवर काही महिला पर्यटकांशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे गोव्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आरम्बोल आणि बागा बीचवर हे प्रकार घडले आहेत. आरम्बोल बीचवर काही लोक दोन विदेशी महिलांसोबत फोटो घेत आहेत. महिलांची इच्छा नसतानाही त्यांना जबरदस्ती करत आहेत. त्या बहाण्याने त्यांच्याशी लगट करत आहेत, असे व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत. दुसऱया एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एका 19 वर्षीय तरुणीने तिच्यावर ओढवलेला कठीण प्रसंग शेअर केला आहे.
पावला-पावलाला मला ‘रेट’ विचारत होते!
मुंबईत पत्रकारिता शिकणाऱया आणि डिस्क जॉकी बनण्याची इच्छा असलेल्या एका तरुणीने तर गोव्याला गेल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे म्हटले आहे. बागा बीचवर आलेला धक्कादायक अनुभव तिने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितला. ‘बागा बीचवर प्रवेश केल्यापासूनच मला त्रास झाला. प्रत्येक पावलावर कोणी ना कोणी मला अडवायचा. माझा रेट विचारायचा. काहींनी मला फुकट ड्रिंक्स आणि जेवणाची ऑफर केली. काही उगीचच बोलू पाहायचे. जवळ यायचे. एकाने तर मला हवे तेवढे पैसे देण्याचीही ऑफर दिली, असे तिने सांगितले. दरवर्षी सोलो ट्रिपवर गोव्याला येणाऱ्या पोलिना गेरचिकोव्हा हिनेही तिच्यासोबत अनेकदा गैरवर्तन झाल्याचे सांगितले.
पोलिसांकडून गंभीर दखल
गोवा पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून आरम्बोल बीचच्या प्रकरणात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बागा बीचवरील गैरवर्तनाची तक्रार करणाऱया महिलेशी पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने संपर्प साधला असून तिने दिलेल्या माहितीवरून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

























































