Scam in School Mid-Day Meal – शालेय पोषण आहारात कोट्यवधींचा ‘वाटाणा’ घोटाळा, विधानसभेत कैलास पाटील यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी आज विधानसभेत केला. शासनाकडून शाळांना १३४ रुपये प्रति किलो दराने उच्च दर्जाचा हिरवा वाटाणा पुरवण्याचे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून केवळ ३० रुपये किलो दराचा अत्यंत हलक्या दर्जाचा पांढरा वाटाणा पुरवला जात असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आमदार कैलास पाटील यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत सांगितले की, कंत्राटदार प्रशासनाशी संगनमत करून स्वस्त दराचा पांढरा वाटाणा शाळांना देत आहेत, मात्र सरकारकडून बिले काढताना ती १३४ रुपये प्रति किलो या चढ्या दराने काढली जात आहेत. हा थेट जनतेच्या पैशांचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा मोठा घोटाळा आहे. या भ्रष्टाचारात अडकलेल्या कंत्राटदारांना पाठीशी घातले जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने तातडीने एसआयटी (SIT) चौकशी जाहीर करावी आणि संबंधित भ्रष्ट पुरवठादारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणी पाटील यांनी सभागृहात केली.