
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुंबईत सुरू आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने आंदोलक आले आहेत. शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट त्यांना पाठिंबा दर्शवला. राज्यभरातून जरांगे यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांची मुंबईत उपासमार होत आहे. त्यांना अन्न-पाणी मिळत नाही. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवे, आ. दिलीप सोपल , विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच कैलास पाटील यांनी आझाद मैदानाला लागूनच डाव्या बाजूला असलेल्या मराठी पत्रकार भवनामध्ये सेंट्रल किचन (अन्नछत्र) ची उभारणा केली. या अन्नछत्राच्या माध्यमातून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळात जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
आपले कर्तव्य म्हणून करता येईल, ती सोय आपल्या बांधवांसाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे पाटील यांनी सांगितले. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्यासोबत लाखो मराठा समाजबांधव उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. मात्र अन्न-पाण्याविना आंदोलकांची होत असलेली परवड पाहून तालुक्यातील बांधवांनी पुढाकार घेत आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्यास सुरुवात केली आहे. कळंब तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात मदत देण्यात येत आहे. आंदोलकांना जेवणाची अडचण येत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भोजन, पाणी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक भाकरी कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये कळंब येथील मराठा समाजही यात मागे राहू नये म्हणून एकदिलाने पुढे सरसावत आहे. गावोगावी काही क्षणात मदतीचा ओघ सुरू झाला.
कळंब शहर, गंभीरवाडी, कोठाळवाडी, खामसवाडी, बोरगाव (खुर्द), भाटशिरपूरा, भोगजी, इटकूर, पिंपळगाव डो. दहिफळ, बाभळगांव, मलकापूर आदी ठिकाणीहून मदत पाठवण्यात आली आहे. तसेच सापनाई गावाकडून आझाद मैदानातील आंदोलकासाठी अन्न छत्र चालू करण्यात आले आहे.
कळंब तालुक्यातील मोहा येथील ग्रामस्थांनी मुंबई येथे आंदोलनामध्ये असणाऱ्या आंदोलकांना भाकरी व चटणी घेऊन जाण्याचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे तीन हजार किलो तांदूळ, तीनशे किलो तेल, तीनशे बिसलेरीचे बॉक्स, तांदूळाचा राईस बनवण्यासाठी आवश्यक असणारा सर्व मसाला,भाजीपाला, बिस्किटाचे बॉक्स अशा या सर्व सामानाचे चार पिकउप भरून ही रसद गावातील ५० युवक मुंबई गेले आहेत. तसेच गावातील सर्व गणेश मंडळांनी डीजे मुक्त मिरवणूक काढून जमा झालेले वर्गणी या अन्नछत्र नियोजन समितीकडे सुपूर्त केली आहे. आली. स्वराज गणेश मंडळ मोहा शिवबा गणेश मंडळ मोहा, राजमाता गणेश मंडळ जय भवानी गणेश मंडळ या सर्व गणेश मंडळांनी आपली वर्गणी या अन्नछत्रासाठी देऊन एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.